लाडक्या बहिणींना दिलासा; निधी वाटपासाठी मिळाली मंजुरी, पैसे खात्यात कधी जमा होतील?

19 Dec 2025 22:48:30
 
Ladki Bahein Yojana Approval
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. तीन टप्प्यांत होणाऱ्या या निवडणुकांमध्ये दोन डिसेंबर रोजी नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या मतदानाचा पहिला टप्पा संपन्न झाला. मात्र, काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या, ज्यांचे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर महापालिका निवडणुका देखील लवकरच होणार असल्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
 
या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेमुळे 'लाडकी बहीण' योजनेतील निधी वितरणात अडचणी येण्याची भीती व्यक्त केली जात होती. विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे पैसे अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नव्हते.
 
परंतु, आता लाडक्या बहिणींना एक मोठा आनंददायक संदेश मिळाला आहे. माहितीप्रमाणे, निवडणूक आयोगाने या योजनेच्या निधी वितरणाला हरकत न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, फडणवीस सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे निधी लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
 
निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजना जुनी असल्यामुळे त्यासाठी निधी देण्यात आचारसंहितेचा काहीही अडथळा नाही, अशी माहिती दिली आहे. राज्य शासनाने अद्याप निवडणूक आयोगाकडे निधी वितरणासाठी अधिकृत परवानगी मागितलेली नाही, तरीही निधी देण्याच्या प्रक्रियेला आचारसंहितेचा काहीही विरोध नाही.
 
मीडिया रिपोर्टनुसार, महापालिका निवडणुकांच्या चार-पाच दिवस आधी नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित देण्याची शक्यता आहे.
 
याशिवाय, लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले असून, सुमारे ४० ते ५० लाख लाभार्थी केवायसी पूर्ण न केल्यामुळे योजनेपासून वगळले जाऊ शकतात. केवायसीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.
Powered By Sangraha 9.0