Image Source:(Internet)
मुंबई :
टीव्ही विश्वातील लोकप्रिय चेहरा आणि विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) हिच्या घरी पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण आहे. भारती आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिय्या हे १९ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा पालक झाले असून, भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘लाफ्टर शेफ्स’ या कार्यक्रमाच्या शूटसाठी भारती तयारी करत असतानाच तिला अचानक प्रसूतीवेदना जाणवू लागल्या. तत्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काही वेळातच तिने मुलाला जन्म दिला.
ऑक्टोबर महिन्यात भारती आणि हर्ष यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. हर्षने भारतीचा बेबी बंप जपून धरलेला फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्या पोस्टवर परिणीती चोप्रा, ईशा गुप्ता, निती टेलर, पार्थ समथान यांच्यासह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून भारती सिंग प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पुढे ‘द कपिल शर्मा शो’मधील तिच्या दमदार भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. विविध लोकप्रिय कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच ती ‘लाफ्टर शेफ्स – सीझन २’मध्येही झळकली होती.
याशिवाय भारती आणि हर्ष एकत्र मिळून एक लोकप्रिय पॉडकास्ट चालवतात, ज्यामध्ये ते नामवंत कलाकारांशी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर मनमोकळ्या गप्पा मारतात. भारती-हर्षच्या या आनंदाच्या क्षणात सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडत आहे.