सातारा ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री शिंदेंवरील आरोप निराधार; मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टिकरण

19 Dec 2025 21:44:04
 
CM Fadnavis DCM Shinde
 Image Source:(Internet)
मुंबई :
सातारा जिल्ह्यात जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde) यांच्याशी संबंध जोडले जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत शिंदेंच्या समर्थनार्थ स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंतच्या तपासात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबियांचा या ड्रग्ज प्रकरणाशी कोणताही संबंध आढळून आलेला नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरजवळील सावरी गावात पोलिसांनी सुमारे १४५ कोटी रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. या मोठ्या कारवाईनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली. शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी ज्या जमिनीतून ड्रग्ज सापडले, ती जमीन प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा दावा केला. प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाऊ असल्याचे सांगितले जात असल्याने हा मुद्दा अधिकच तापला.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतुक करत, ही कारवाई मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करणारी असल्याचे सांगितले. तसेच, विरोधकांकडून जाणूनबुजून या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव ओढले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
तपास अद्याप सुरू असून, सर्व बाबी तथ्यांच्या आधारेच समोर येतील, असे सांगत फडणवीस यांनी स्पष्ट केले की सध्या तरी कोणत्याही पातळीवर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबियांची संलिप्तता सिद्ध झालेली नाही.
 
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावरही थोडक्यात प्रतिक्रिया दिली. कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, त्यांच्याकडे असलेले खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कोकाटे यांच्या आमदारकी किंवा न्यायालयीन प्रक्रियेबाबत त्यांनी भाष्य टाळले.
 
दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देत, सत्ताधाऱ्यांनी संविधानाचा सन्मान ठेवावा आणि कायद्याला स्वतंत्रपणे काम करू द्यावे, असे म्हटले. आपण थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत नसून, त्यांच्या भावाशी संबंधित बाबींवर प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
तसेच, प्रकाश शिंदे उपमुख्यमंत्रीपदाचा प्रभाव वापरून तपासावर दबाव टाकू शकतात, अशी शंका व्यक्त करत, तपास पूर्ण होईपर्यंत एकनाथ शिंदे यांनी काही काळ आपल्या पदापासून दूर राहावे, अशी मागणीही अंधारे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0