Image Source:(Internet)
नाशिक :
सुमारे तीन दशकांपूर्वीच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Kokate) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी झाल्याची माहिती समजताच त्यांची प्रकृती अचानक खालावल्याचे सांगण्यात येत आहे. रक्तदाब वाढणे आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोकाटे मुंबईकडे रवाना झाले होते. सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांच्या सतत देखरेखीखाली त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे.
अटक टाळण्यासाठी कोकाटेंनी उच्च न्यायालयात तातडीची धाव घेतली होती. मात्र, या याचिकेवर तत्काळ दिलासा न मिळाल्याने त्यांच्यासमोरील संकट अधिक गडद झाले आहे. उपचार सुरू असतानाच त्यांना अटक होणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. काही ठिकाणी अटक टाळण्यासाठीच रुग्णालयात दाखल झाल्याचा आरोपही केला जात आहे.
शासकीय सदनिका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईची तयारी सुरू केली असून, पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आमदारकी धोक्यात?
मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोकाटेंच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले होते. आता मात्र हे प्रकरण केवळ मंत्रिपदापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आमदारकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तीन दशकांपूर्वीच्या प्रकरणामुळे कोकाटेंची राजकीय वाटचाल डगमगत असून, पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, या शक्यतेमुळे या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.