‘धुरंधर’ची बॉक्स ऑफिसवर एकहाती सत्ता; ‘पुष्पा 2’, ‘छावा’ही पडले मागे, 400 कोटींचा टप्पा ओलांडला

18 Dec 2025 11:22:41
 
400 crore mark
 Image Source:(Internet)
मुंबई :
रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar) सध्या बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. रिलीजपासूनच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचत अनेक मोठ्या सिनेमांना मागे टाकले आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय-थ्रिलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून दुसऱ्या आठवड्यातही त्याची घोडदौड सुरूच आहे.
 
रिलीज झाल्यापासून ‘धुरंधर’ने सलग रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी प्रचंड कमाई केल्यानंतर, भारतीय चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या सोमवारी सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट ठरण्याचा मान त्याने पटकावला. त्यानंतर मंगळवारीही सिनेमाने दमदार कमाई करत आपली ताकद सिद्ध केली. दहा दिवस उलटून गेले तरीही सिनेमाची क्रेझ कायम आहे.
 
2025 च्या सुरुवातीला विक्की कौशलच्या ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व मिळवले होते. मात्र त्यानंतर इतकी प्रभावी कामगिरी कोणत्याही चित्रपटाला करता आली नव्हती. अखेर ‘धुरंधर’ने ‘छावा’प्रमाणेच बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवत वर्षातील सर्वात चर्चेत असलेला सिनेमा बनण्याचा मान मिळवला आहे.
 
बाराव्या दिवशीही ‘धुरंधर’ची धडाकेबाज कमाई
बॉलिवूड स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ला 12 दिवस पूर्ण झाले असूनही त्याची कमाई थांबायचं नाव घेत नाही. यंदा रिलीज झालेल्या अनेक चित्रपटांच्या तुलनेत ‘धुरंधर’चे कलेक्शन लक्षणीय आहे. सकाळ-दुपारच्या शोसह संध्याकाळ व रात्रीचे शोही हाऊसफुल्ल जात आहेत.
 
सुमारे 3 तास 32 मिनिटांचा दीर्घ कालावधी असूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरकडे वळत आहेत. दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी भारतात तब्बल 140 कोटींची कमाई करत ‘धुरंधर’ने हिंदी सिनेमांसाठी नवा विक्रम नोंदवला. दुसऱ्या सोमवारी 29 कोटींची कमाई झाल्यानंतर, सॅकनिल्कच्या प्राथमिक अहवालानुसार दुसऱ्या मंगळवारी तब्बल 30 कोटी रुपये कमावले गेले.
यासह ‘धुरंधर’ची 12 दिवसांची एकूण देशांतर्गत कमाई 411.25 कोटींवर पोहोचली आहे.
मोठ्या ब्लॉकबस्टरनाही मागे टाकले-
दुसऱ्या मंगळवारी 30 कोटींच्या कमाईसह ‘धुरंधर’ने ‘पुष्पा 2’ (18.5 कोटी), ‘छावा’ (18.5 कोटी), ‘बाहुबली 2’ (15.75 कोटी) आणि ‘जवान’ (12.9 कोटी) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडले. सध्याचा वेग पाहता, तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस हा सिनेमा 500 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
 
400 कोटींचा टप्पा वेगात पार करणारा पाचवा सिनेमा-
‘धुरंधर’ने अवघ्या 12 दिवसांत 400 कोटींचा आकडा गाठत आणखी एक इतिहास रचला आहे. सर्वात वेगाने 400 कोटी कमावणारा हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला असून, त्याने ‘स्त्री 2’ (402.8 कोटी) आणि ‘गदर 2’ (400.7 कोटी) यांनाही मागे टाकले आहे.
 
‘धुरंधर’ विरुद्ध ‘छावा’ : कमाईची शर्यत-
‘छावा’ हा आतापर्यंत 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट मानला जात होता. विक्की कौशलच्या या सिनेमाने 12 दिवसांत 363.25 कोटींची कमाई केली होती. मात्र रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने 12 दिवसांतच 400 कोटींचा टप्पा ओलांडत ‘छावा’ला मागे टाकले आहे.
 
आता ‘धुरंधर’ ‘छावा’च्या लाईफटाइम कलेक्शनलाही मागे टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही चित्रपटांमध्ये अक्षय खन्ना खलनायकाच्या भूमिकेत झळकले होते, ही बाबही प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0