काँग्रेसला मोठा हादरा; राहुल गांधींच्या विश्वासू कुटुंबातील सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश

18 Dec 2025 15:16:52
 
Dr Pragya Satav
 Image Source:(Internet)
मुंबई:
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून काँग्रेस (Congress) पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसशी फारकत घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील काँग्रेस गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
डॉ. प्रज्ञा सातव यांनी गुरुवारी (१८ डिसेंबर) मुंबईत विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांची भेट घेऊन आपल्या विधान परिषद आमदारकीचा औपचारिक राजीनामा सादर केला. त्यानंतर त्यांनी भाजपच्या मुंबईतील पक्ष कार्यालयात जाऊन जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे २०३० पर्यंत आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक असतानाही त्यांनी पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
बावनकुळेंनी काय सांगितले कारण?
डॉ. प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. हिंगोली जिल्हा दीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला असून स्व. राजीव सातव यांनी या भागासाठी मोठे स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेत हिंगोलीला अग्रस्थानी नेण्यासाठी प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्याला विकासाची नवी दिशा मिळाली असून, आता राजकीय बळकटीमुळे हा विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान, स्व. राजीव सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसमधील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जात होते. २०१४ च्या मोदी लाटेतही महाराष्ट्रातून निवडून आलेल्या मोजक्या काँग्रेस खासदारांमध्ये त्यांचा समावेश होता. अशा पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी आणि दोनदा विधान परिषद आमदार राहिलेल्या प्रज्ञा सातव यांचा भाजप प्रवेश हा हिंगोलीत काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
डॉ. प्रज्ञा सातव : थोडक्यात परिचय
डॉ. प्रज्ञा सातव या स्व. राजीव सातव यांच्या पत्नी असून हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर २०२१ मध्ये त्या विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आल्या. २०२४ मध्ये काँग्रेसने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत दुसऱ्यांदा आमदारकीची संधी दिली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली असून गेल्या अनेक वर्षांत शेतकरी व शेतमजुरांच्या प्रश्नांसाठी त्या सक्रिय राहिल्या आहेत. गांधी कुटुंबाच्या विश्वासू वर्तुळात गणल्या जाणाऱ्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी आता कार्यकाळ शिल्लक असतानाच आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.
Powered By Sangraha 9.0