नागपूरमधील अतिक्रमणांवर गडकरींचा स्पष्ट इशारा; मनपा आयुक्तांना थेट सूचना

15 Dec 2025 17:27:04
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौक ते ऑटोमोटिव्ह चौक या सिमेंट रस्त्याच्या उद्घाटन व विविध विकासकामांच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Gadkari) यांनी अतिक्रमणांच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडली. नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना उद्देशून त्यांनी मिश्कील पण ठाम शब्दांत प्रशासनाला इशारा दिला.
 
“नवे रस्ते बांधले जातात, पण काही दिवसांतच फुटपाथवर दुकाने पुन्हा उभी राहतात. मग पादचाऱ्यांनी चालायचं कुठे?” असा सवाल उपस्थित करत गडकरी म्हणाले की, रस्ते केवळ चांगले बांधून उपयोग नाही, तर फुटपाथ मोकळे ठेवणे तितकेच गरजेचे आहे. त्यांच्या या टोलेबाज वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
 
गडकरी यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक चौक ते ऑटोमोटिव्ह चौक हा सिमेंट रस्ता नागपूरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल. शहरातील उड्डाणपूल, प्रमुख रस्ते आणि मेट्रोसारख्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांना अधिक वेग देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
 
अतिक्रमणामुळे शहराच्या सौंदर्यीकरणासह नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे नमूद करत गडकरी म्हणाले, “रस्ते कितीही दर्जेदार असले तरी फुटपाथ अडथळामुक्त नसतील, तर सामान्य नागरिकाला दिलासा मिळणार नाही.” त्यांच्या या वक्तव्यावर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अतिक्रमणांवर लवकरच कारवाईचे संकेत दिले.
 
या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूरचा सर्वांगीण विकास हेच आपले उद्दिष्ट असून, शहराला आधुनिक मल्टिमोडल हब म्हणून विकसित करण्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे नागपूरकरांमध्ये विकासाबाबत नव्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0