स्वतंत्र विदर्भावरून संजय राऊतांचा घणाघाती हल्ला; भाजपसह काँग्रेसलाही सुनावले खडेबोल!

13 Dec 2025 12:27:18
 
Sanjay Raut
 Image Source;(Internet)
मुंबई :
वेगळ्या विदर्भाच्या चर्चेला पुन्हा उधाण आल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि काँग्रेसवर एकाच वेळी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा कोणताही प्रयत्न मराठी माणूस कदापि सहन करणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
 
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतंत्र विदर्भासाठी प्रयत्न करत असल्याचे सूचित केल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपवर थेट निशाणा साधला. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत असताना शिंदे गटातील एकही आमदार विरोधात उभा राहत नाही, यावरून त्यांनी एकनाथ शिंदे गटावरही टीका केली. “हे सर्व अमित शाहांच्या आदेशावर चालणारे आहेत,” असा आरोप करत त्यांनी भाजपवर घणाघात केला.
 
पालघर जिल्ह्याबाबत बोलताना राऊतांनी गुजरातकडून होणाऱ्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. पालघरमधील ठेकेदारी व्यवसायात गुजरातींचे प्राबल्य वाढत असल्याचा आरोप करत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात डांग, उंबरगाव, डहाणू आणि पालघरवर गुजरातने दावा केल्याची आठवण त्यांनी करून दिली. याच पार्श्वभूमीवर बुलेट ट्रेनचा मार्ग पालघरमधून नेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र म्हणजे कोणाच्या सरकारची खाजगी मालमत्ता नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
 
दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याच्या चर्चांवर संजय राऊतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या या भूमिकेला आम्ही फारसे महत्त्व देत नसल्याचे सांगत, याआधीही या मुद्द्यावरून काँग्रेसशी मतभेद झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, महाराष्ट्र अखंड राहावा यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
“काँग्रेस कितीही आदळआपट केली तरी स्वतंत्र विदर्भाचा प्रश्नच नाही. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही,” असे ठाम मत व्यक्त करत राऊतांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र असल्याचे अधोरेखित केले. महाराष्ट्र तोडण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना ती कधीच पूर्ण होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
Powered By Sangraha 9.0