Image Source;(Internet)
नागपूर :
ग्रामीण भागातील गरीब व बेघर कुटुंबांसाठी दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे. पक्क्या घराचं स्वप्न असूनही स्वतःची जागा नसल्यामुळे आतापर्यंत घरकुल (Gharkul) योजनेपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना आता थेट लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (घरकुल) अंतर्गत अशा पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक असलेली जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नव्या धोरणानुसार, स्वतःचा भूखंड नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. भूखंड खरेदी करून त्याची नोंदणीकृत कागदपत्रे सादर केल्यानंतर ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामीण गरीब कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
घरकुल योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी ठोस निकषही निश्चित करण्यात आले आहेत. घरासाठी किमान ६०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड आवश्यक असून त्यावर ३२३ ते ४८५ चौरस फूट क्षेत्रफळाचे घर बांधणे बंधनकारक असेल. या घरात स्वयंपाकघर, किमान एक किंवा दोन खोल्या तसेच शौचालय असणे अनिवार्य राहणार आहे. प्रत्येक लाभार्थ्याला मूलभूत सुविधा मिळाव्यात, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
ग्रामीण भागात वाढती लोकसंख्या, दाट वस्ती आणि मालकी हक्कासंबंधी अडचणींमुळे अनेकांना घरासाठी योग्य जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्वतःची जमीन नसणे हे घरकुल मिळण्यातील मोठे अडथळे ठरत होते. मात्र जागा खरेदीसाठी मिळणाऱ्या या अनुदानामुळे हा अडथळा दूर होणार असून, गरीब कुटुंबांना स्वतःचं घर उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे आर्थिक मदत देत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वाटप झाले असून अनेक गावांमध्ये बांधकामे सुरू आहेत. खरीप हंगाम संपत असल्याने अनेक लाभार्थी आता घरकुल उभारणीसाठी सज्ज होत आहेत.
योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात भूखंडाचे माप, घराचे क्षेत्रफळ आणि बांधकामाची रचना याबाबत नियम अधिक स्पष्ट करण्यात आल्याने अंमलबजावणी अधिक पारदर्शक आणि प्रभावी होणार आहे. परिणामी ग्रामीण गरीब कुटुंबांचे ‘हक्काचं घर’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यास मोठी मदत मिळणार आहे.