लोकराज्यच्या समृद्ध वारशाला उजाळा; मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे यांची विधानभवनातील प्रदर्शनाला भेट

11 Dec 2025 22:58:22
 
Rahul Pandey visits the exhibition
 Image Source:(Internet)
नागपूर :
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्वाचा ठसा उमटवणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या ऐतिहासिक प्रवासाला आज विधानभवनात विशेष उजाळा मिळाला. हिवाळी अधिवेशनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने जुन्या दुर्मिळ लोकराज्य विशेषांकांचे प्रदर्शन आयोजित केले असून, राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहूल पांडे (Rahul Pandey) यांनी या प्रदर्शनाला भेट देत मासिकाच्या महत्वाच्या योगदानांची आठवण केली.
 
राहूल पांडे यांनी सांगितले की,
“महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर लोककल्याणकारी योजनांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य लोकराज्यने प्रभावीपणे पार पाडले आहे. शासन निर्णयांची नोंद, प्रशासनातील बदल आणि लोकप्रशासनाचा उत्क्रांत प्रवास — या सर्वांचा जिवंत दस्ताऐवज लोकराज्य रूपाने आपल्यासमोर आहे.”
 
नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव, तसेच मेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे यांनीही प्रदर्शनाला भेट दिली. त्यांच्याशी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी संवाद साधला.
 
निमदेव यांनी सूचित केले की हे प्रदर्शन फक्त विधानसभा परिसरापुरते मर्यादित राहू नये, तर शहरातही महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शित करावे, जेणेकरून अधिकाधिक नागरिकांना या वारशाचा लाभ मिळू शकेल. “स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठीही लोकराज्यची माहिती मार्गदर्शक ठरते,” असे त्यांनी नमूद केले.
 
दरम्यान, माहिती देण्यात आली की प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली लोकराज्यचे पाच दशकांहून अधिक जुने अंक लवकरच डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन वेगाने सुरू आहे, ज्यामुळे हा अनमोल इतिहास जगभरातील प्रत्येकाला एका क्लिकवर मिळू शकेल.
 
माजी मंत्री सुधीर मुनगटीवार, तसेच आमदार भिमराव तपकीर यांनीही प्रदर्शनाला भेट देत आयोजनाचे कौतुक केले.
 
या प्रदर्शनात १९६४ पासूनचे जवळपास दीडशे विशेषांक ठेवण्यात आले आहेत. यात ज्ञानेश्वरी शताब्दी, महात्मा फुले स्मृती शताब्दी, शाहू महाराज, बालगंधर्व, छत्रपती शिवाजी महाराज, आदिवासी विशेषांक, मराठी भाषा, कोकण-विदर्भ विशेषांक, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, संत परंपरा अशा विविध विषयांचे दुर्मिळ अंक पाहता येत आहेत.
 
राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासकीय इतिहासाची मोलाची पाऊलखूण जपणारे लोकराज्यचे हे प्रदर्शन नागरिकांसाठी आणि अभ्यासकांसाठी एक ऐतिहासिक पर्वणी ठरले आहे.
Powered By Sangraha 9.0