बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा उघड; 719 सरकारी कर्मचारी चौकशीत

11 Dec 2025 15:56:31
 
Fake disability certificate scam
 Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रात बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या (Fake disability certificate) आधारे सरकारी नोकऱ्या मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारला 719 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या असून या सर्व प्रकरणांची चौकशी सुरू आहे. ही माहिती दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत दिली.
 
विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान हे स्पष्ट झाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची नव्याने पडताळणी केली जात आहे. प्रमाणपत्रे बनावट आढळल्यास किंवा दिव्यांगत्वाची टक्केवारी नियमांनुसार नसल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.
 
राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर आल्या असून काही ठिकाणी निलंबन आणि सेवेतून कमी करण्याची कारवाई झाली आहे. सरकारने सर्व विभागांना 8 जानेवारी 2026 पर्यंत पडताळणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या नोकऱ्या आणि सुविधा केवळ पात्र व्यक्तींनाच मिळाव्यात, यासाठी ही तपासणी मोहीम राबवली जात असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0