चंद्रपूर जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा भंडाफोड; १२ कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बडतर्फी

10 Dec 2025 14:39:00
 
Chandrapur ZP
 Image Source:(Internet)
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा परिषदेत (Chandrapur ZP) सुरू असलेल्या दस्तऐवज पडताळणी मोहिमेदरम्यान मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. दिव्यांग कोट्यातून नोकरी मिळवलेल्या काही कर्मचाऱ्यांनी आवश्यक यूडीआयडी (UDID) प्रमाणपत्र सादर न केल्याचे, तर काहींचे अपंगत्व निर्धारित निकषांपेक्षा कमी असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने धडाकेबाज कारवाई केली आहे.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी आदेश काढत १२ कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेतून बडतर्फ केले. या कारवाईत १० शिक्षक आणि २ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश असल्याने विविध विभागांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
ही तपासणी अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. दस्तऐवजांची छाननी करताना काही कर्मचाऱ्यांकडे दिव्यांगत्वाचे आवश्यक पुरावेच नसल्याचे तर काहींच्याकडे सादर केलेले प्रमाणपत्र नियमांनुसार ग्राह्य नसल्याचे स्पष्ट झाले.
 
या प्रकरणानंतर जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासनाने तपासणी आणखी कडक केली असून पुढील काही दिवसांत अजून काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
या निर्णयामुळे जिल्हा परिषदेत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व विभागांनी संबंधित कागदपत्रांची तातडीने पुनर्पडताळणी सुरू केली आहे.
Powered By Sangraha 9.0