लोकसभेत ‘वंदे मातरम’वर विशेष चर्चा; पंतप्रधान मोदींचा सहभाग निश्चित

01 Dec 2025 23:35:39
 
Vande Mataram
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या आठवड्यात ‘वंदे मातरम’ (Vande Mataram) या राष्ट्रगीतावर सखोल चर्चा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेने या चर्चेसाठी तब्बल दहा तासांचा कालावधी राखून ठेवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या विशेष चर्चेत सहभागी होणार आहेत.
 
१५० वर्षांच्या प्रवासाचा टप्पा गाठलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा आढावा या चर्चेत घेतला जाणार आहे. देशातील स्वातंत्र्यलढ्यास जोम देणाऱ्या या गीताची निर्मिती बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी केली होती. ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘बंगदर्शन’ मासिकातून प्रथम प्रकाशित झालेले हे राष्ट्रगीत आजही राष्ट्रभावनेचे प्रतीक मानले जाते.
 
गेल्या महिन्यात गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारने या महत्त्वपूर्ण प्रसंगी एक विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकिटाची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी ‘वंदे मातरम’ला भारताच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा गौरवशाली वारसा म्हणून संबोधत तरुणांना हे गीत आवर्जून गायला प्रोत्साहन दिले.
 
दरम्यान, १ डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात एकूण १५ बैठका होणार आहेत. या काळात १० नवी विधेयके सादर केली जाण्याची शक्यता आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे कामकाजाला अडथळा आला. गोंधळाच्या वातावरणात लोकसभेने मणिपूर वस्तू व सेवा कर (दुसरी दुरुस्ती) विधेयक, २०२५ मंजूर केले. याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय उत्पादन शुल्क (दुरुस्ती) विधेयक आणि आरोग्य सुरक्षा उपकर विधेयक सादर केले.
 
गदारोळ न थांबल्याने प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तास दोन्ही बाधित झाले. अखेर सभागृह मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0