नगरपंचायत-नगरपरिषद निवडणुका : प्रचाराचा महामेरू आज थंडावणार; उद्या होणार मतदान

01 Dec 2025 12:35:52
 
Elections
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील २७६ नगरपंचायती (Nagar Panchayat) आणि २५ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीचा तापलेला प्रचार आज सायंकाळी पाचला थांबला. दोन आठवड्यांपासून ग्रामीण महाराष्ट्रात सुरू असलेल्या रॅली, रोड शो, सभांमधील घोषणाबाजी आणि उमेदवारांच्या दैनंदिन फेरफटक्यांनी निर्माण झालेल्या राजकीय धगेला अखेर विराम मिळाला आहे.
 
महायुतीत सुरू असलेल्या मतभेदांचे पडसाद अनेक ठिकाणी उमेदवारीत उमटले. काही तालुक्यांत भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट प्रत्यक्ष आमनेसामने उभे राहिल्याने स्पर्धा चुरशीची झाली आहे. दरम्यान, काही जागांवर बंडखोर उमेदवारांनी समीकरणे ढवळून काढली असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही गोंधळाचे वातावरण जाणवले. दुसरीकडे, महाविकास आघाडीने संयुक्त सभा घेत प्रचाराची लय वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र समन्वयाच्या प्रश्नांना काही ठिकाणी तोंड द्यावे लागले.
 
गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामे रेंगाळली. पाणीपुरवठा, रस्त्यांचा दर्जा, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे प्रश्न सतत भेडसावत राहिले. त्यामुळे यंदा मतदारांचे लक्ष पक्षनिष्ठेपेक्षा गाव पातळीवरील प्रत्यक्ष कामगिरी आणि भविष्यातील विकास आराखड्यांवर केंद्रित झाले आहे.
 
उद्या २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत मतदान पार पडणार असून ७५ लाखांपेक्षा जास्त मतदार आपले प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान केंद्रावर जाणार आहेत. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असून निकालांवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.
 
या निवडणुका ग्रामीण राजकारणातील पुढील दिशा ठरवणार असल्याने उद्याचा मतदान दिवस राज्यातील प्रत्येक राजकीय समीकरणासाठी निर्णायक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0