
Image Source:(Internet)
इस्लामाबाद :
पाकिस्तानच्या (Pakistan) बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा दहशतवादाचा कहर पाहायला मिळाला. नोकुंडी परिसरातील लष्कराच्या तळाजवळ वसलेल्या विशेष निवासी वसाहतीवर रविवारी मध्यरात्री आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन फ्रंट या संघटनेने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक झालेल्या स्फोटांच्या मालिकेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटानंतर काही हल्लेखोरांनी सुरक्षा पथकांवर गोळीबार केल्याची माहिती आहे. सततच्या धमाक्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दलांनी तत्काळ वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे.
ज्या वसाहतीवर हल्ला झाला, त्या ठिकाणी खाण प्रकल्पांशी संबंधित विदेशी तज्ज्ञ आणि अभियंत्यांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. या प्रकल्पांच्या माध्यमातून देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक अपेक्षित होती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हल्ल्यानंतर चगाई जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून मृत आणि जखमींच्या संभाव्य संख्येबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बलुचिस्तानातील रिको डिक आणि सैंदक यांसारखे खाण प्रकल्प आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी आकर्षण ठरत असताना अशा प्रकारचे हल्ले स्थैर्य आणि सुरक्षिततेबाबत नवे प्रश्न उपस्थित करीत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून या प्रांतात दहशतवादी कारवायांचे प्रमाण वाढले असून पायाभूत प्रकल्प थेट लक्ष्य केले जात असल्याचे नमूद केले जात आहे.
काही दिवसांपूर्वीच पेशावरमधील लष्करी तळावरही आत्मघातकी हल्ला झाल्याने पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा सततच्या दबावाखाली आहे. सलग होत असलेल्या घटनांमुळे दहशतवादावरील नियंत्रण आणि सरकारची धोरणे पुन्हा चर्चेत आली आहेत.