Image Source:(Internet)
नागपूर :
खापरखेडा (Khaparkheda) परिसरात पिकनिकला गेलेल्या तीन मित्रांवर झालेल्या निर्घृण हल्ल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. अखेर या प्रकरणाची कोडे उलगडत क्राईम ब्रांच युनिट-४ने फरार आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
माहितीनुसार, २३ नोव्हेंबरच्या संध्याकाळी सुशीलकुमार गेडाम, आशिष गोंडाणे आणि सचिन मिश्रा हे ‘बिना संगम’ परिसरात पिकनिकसाठी गेले होते. याचदरम्यान ४ ते ५ अनोळखी युवक त्या ठिकाणी आले आणि किरकोळ वाद वाढत जाऊन त्याने हिंसक रूप घेतले. आरोपींनी सुशीलकुमार आणि आशिषवर दगड व धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिष गोंडाणे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सुशील गेडाम यांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
त्यानंतर क्राईम ब्रांचने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि आधुनिक तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत सर्वांना अटक केली. दरम्यान पुढील तपास खापरखेडा पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण समोर येण्याची अपेक्षा आहे.