Image Source:(Internet)
हैदराबाद :
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रूथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) अखेर दिग्दर्शक व अभिनेता राज निदिमोरूसोबत लग्नगाठ बांधली आहे. नागा चैतन्यपासून झालेल्या विभक्तीनंतर जवळजवळ चार वर्षांनी समंथाने आयुष्याला नवी दिशा देत सोमवार, १ डिसेंबर रोजी एका खाजगी समारंभात विवाह केला.
समंथाने इंस्टाग्रामवर लग्नातील खास क्षण शेअर करत ‘1.12.2025’ अशी तारीख लिहिली आहे. फोटोंमध्ये हे नवदांपत्य मंदिरात पारंपरिक पद्धतीने विधी पूर्ण करताना दिसत आहे. पवित्र अग्नीला साक्षी ठेवून दोघांनी सात फेरे घेतले. एका फोटोत राज समंथाच्या बोटात अंगठी घालताना दिसतो, तर दुसऱ्या छायाचित्रात दोघेही शुभाग्नीसमोर हातात हात घालून उभे आहेत.
या प्रसंगी समंथाने नेसलेली लाल रंगाची साडी, सोन्याचे दागिने आणि केसांतील गजरा तिच्या नववधूच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते. राज निदिमोरूही पारंपरिक वेशभूषेत देखणे दिसत होते.
समंथाच्या या नव्या सुरुवातीने संपूर्ण मनोरंजनक्षेत्रात आनंदाची लहर उसळली असून चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेत्रीने नव्या आयुष्याकडे टाकलेले पाऊल तिच्या चाहत्यांसाठीही आनंदाचा क्षण ठरला आहे.