पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे; रवींद्र धंगेकर यांची मागणी, महायुतीत ठिणगी!

    08-Nov-2025
Total Views |

Parth Pawar Ravindra DhangekarImage Source:(Internet) 
पुणे :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन व्यवहारातील अनियमिततेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पार्थ पवारांवर थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे सेनेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केली असून, या वक्तव्यानंतर महायुतीत नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
 
सह जिल्हा निबंधक कवर्ग १ यांनी बावधन पोलीस ठाण्यात ४० हेक्टर जागेच्या संशयास्पद खरेदीबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या ५ एकर जमिनीच्या व्यवहारातही घोटाळा उघड झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही व्यवहारांत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा थेट सहभाग असल्याचं दस्तऐवजांतून स्पष्ट झालं आहे.
 
कंपनीतील ९९ टक्के शेअर्स पार्थ पवारांच्या नावावर असून, १ टक्का वाटा दिग्विजय पाटील यांच्या नावावर आहे. पाटील यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला असून, शीतल तेजवानी यांच्यासह इतरांवरही कारवाई करण्यात आली आहे. शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
 
या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास समिती (SIT) स्थापन करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार आठ अधिकाऱ्यांची टीम तपास सुरू करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशी अहवाल एका महिन्यात सादर होईल, असं स्पष्ट केलं आहे.
 
दरम्यान, धंगेकर म्हणाले,कोंढवा जमीन व्यवहारात सगळी सिस्टीम चुकली आहे. गुन्हा दाखल झाला आहे, पण पार्थ पवारांना वगळण्यात आलं हे का? दादांच्या मुलावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा न्यायसंस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.”
 
अजित पवारांवर टीका करत धंगेकर म्हणाले,चुकीला माफी नाही! पार्थ पवार चुकलेत, चोरी करायची आणि मग पैसे परत द्यायचे.हा प्रकार चालणार नाही. दोन्ही प्रकरणांची ED मार्फत चौकशी व्हावी. वडिलांची पॉवर मुलगा वापरतोय, पण आता कठोर कारवाई झालीच पाहिजे. दादांचं ऐकत नाहीत, पक्षातही नाही आणि घरातही नाहीत!”
 
या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अजित पवार आणि शिंदेसेना यांच्यातील अंतर्गत अस्वस्थता आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.