Image Source:(Internet)
नागपूर :
‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’च्या दुसऱ्या दिवशी नागपूरच्या हवेत भक्तीचा, सुरांचा आणि तरुणाईच्या जोशाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. लोकप्रिय गायक विशाल मिश्रा (Vishal Mishra) यांच्या “आज गली गली नागपूर सजायेंगे… राम आएंगे” या गीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला, आणि प्रेक्षकांनी एक स्वरात “राम आएंगे”चा जयघोष करत संध्याकाळ संस्मरणीय केली.
शनिवारी रात्री ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’साठी हजारोंचा समुद्र उसळला होता. मैदान फुल्ल झाल्यानंतरही बाहेर प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत होती.
विशाल मिश्रा यांनी चाहत्यांना उद्देशून म्हटले, “मी स्वप्न पाहिली ती तुमच्यासाठीच, माझे प्रत्येक गाणे तुमचं आहे.” त्यांच्या ‘क्या मुझे प्यार है’, ‘तू पहला प्यार है मेरा’, ‘मैं चाहूँ तुझको बेपनाह’ यांसारख्या हिट गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
चाहत्यांचा जल्लोष, जयजयकाराने दुमदुमले वातावरण-
संगीत सुरू होताच प्रकाश आणि तालांच्या लहरींनी मंच उजळला. विशाल मिश्रा मंचावरून खाली उतरल्यावर चाहत्यांनी सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी अक्षरशः गर्दी केली. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना या संगीतमय सायंकाळीचा आनंद घेता आला.
या कॉन्सर्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि महोत्सवाचे सूत्रधार नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार प्रवीण दटके, अॅड. सुलेखाताई कुंभारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी झालेल्या गीता पठण विश्वविक्रमाच्या प्रमाणपत्राचे वितरणही याच कार्यक्रमात करण्यात आले.
नागपुरात एक लाख क्षमतेचे स्टेडियम उभारण्याची गडकरींची इच्छा
नागपूरकरांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल समाधान व्यक्त करत नितीन गडकरी म्हणाले, “लोकांचा प्रतिसाद पाहून मन भारावले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येतात, पण जागेअभावी सर्वांना कार्यक्रम पाहता येत नाही. त्यामुळे नागपुरात भविष्यात एक लाख क्षमतेचे आधुनिक स्टेडियम उभारले जावे, अशी माझी इच्छा आहे.”
हा महोत्सव नागपूरचा आत्मा आहे – मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “खासदार सांस्कृतिक महोत्सव हा फक्त कार्यक्रम नाही, तो नागपूरच्या संस्कृतीचा उत्सव आहे. या माध्यमातून स्थानिक कलाकारांना मंच मिळतो, आणि देशभरातील कलावंतांच्या कलाकृती नागपूरकरांना पाहायला मिळतात.”
त्यांनी गीता पठण उपक्रमाच्या यशाबद्दल आयोजक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
महोत्सव यशस्वी करणाऱ्या टीमचे विशेष योगदान
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी स्वागतपर भाषण केले, तर सूत्रसंचालन रेणुका देशकर आणि बाळ कुलकर्णी यांनी केले.
महोत्सवाच्या यशासाठी डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, संदीप गवई, प्रा. राजेश बागडी, गुड्डू त्रिवेदी, रेणुका देशकर, मनिषा काशीकर, अॅड. नितीन तेलगोटे, विजय फडणवीस, महेंद्र राऊत आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अंततः, नागपूरकरांचा उत्साह, विशाल मिश्राचे मंत्रमुग्ध करणारे स्वर आणि आयोजकांची मेहनत यामुळे ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-2025’ची दुसरी रात्र खरोखरच अविस्मरणीय ठरली.