- सुलेखा कुंभारेसह जपानी पाहुण्यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदनेने झाला प्रारंभ!
Image Source:(Internet)
नागपूर :
कामठीची ओळख आणि अभिमान ठरलेलं जागतिक दर्जाचं ड्रॅगन पॅलेस (Dragon Palace) मंदिर यंदा आपल्या २६ व्या वर्धापनदिनाच्या औचित्याने भक्तिभाव, श्रद्धा आणि भव्यतेने उजळून निघालं. या विशेष प्रसंगी मंदिर प्रमुख व माजी मंत्री सुलेखा कुंभारे, तसेच जपानमधील ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदनेने महोत्सवाचा प्रारंभ झाला.
तीन दिवस चाललेला हा वार्षिकोत्सव ड्रॅगन पॅलेस महोत्सव समिती तर्फे आयोजित करण्यात आला होता, जो ७ नोव्हेंबरपर्यंत संपन्न झाला. या काळात विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर उजळून निघाला. स्थानिक नागरिक, भिक्खू, तसेच बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला.
महोत्सवाच्या अंतिम दिवशी सुप्रसिद्ध गायिका कदुबाई खरात आणि सांच ग्रुप यांच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेलं. त्यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी भीम गीतांनी उपस्थित भाविकांच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं.
उत्सवादरम्यान बुद्ध वंदना, ध्यान सत्र, सांस्कृतिक सादरीकरणं, तसेच सामाजिक जागरूकतेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. “शांती, करुणा आणि बंधुत्व” हा संदेश देत ड्रॅगन पॅलेस मंदिराचा हा वार्षिकोत्सव आध्यात्मिकतेसह सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरला.
या प्रसंगी सुलेखा कुंभारे यांनी सांगितलं, “ड्रॅगन पॅलेस हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, जागतिक शांततेचं आणि मानवी एकतेचं केंद्र आहे.कामठीतील हा वर्धापन दिन केवळ बौद्ध अनुयायांसाठी नव्हे, तर सर्व धर्मीयांसाठी एकतेचा संदेश देणारा महोत्सव ठरल्याचं सर्व उपस्थितांनी नमूद केलं.