दुबार-तिबार मतदारांना मिळणार ‘डबल-ट्रिपल’ मतदानाची संधी; जाणून घ्या नेमका नियम काय सांगतो?

07 Nov 2025 11:45:49
 
Elections Voters
 Image Source:(Internet)
सोलापूर :
राज्यात तब्बल २० लाखांवर मतदार (Voters) असे आहेत ज्यांची नावे दोन किंवा तीन मतदार यादींत आहेत. यात काहीजण शहरी भागातील तर काही ग्रामीण भागातील मतदार यादीत नोंद झालेले आहेत. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होत असल्याने हे मतदार नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिकेत सर्व ठिकाणी मतदान करू शकतील, असा नियम स्पष्ट झाला आहे.
 
निवडणुकीच्या वेळी अंतिम झालेल्या मतदारयादीत जर त्या मतदाराचे नाव अस्तित्वात असेल, तर त्याला मतदानाचा अधिकार नाकारता येणार नाही. त्यामुळे ज्या मतदारांची नावे वेगवेगळ्या यादींत आहेत, त्यांना प्रत्येक निवडणुकीत मतदान करता येईल.
 
सोलापूर जिल्ह्यातील आकडेवारीनुसार ६८ हजारांहून अधिक मतदार दुबार किंवा तिबार नोंद झालेले आहेत. त्यापैकी नगरपरिषद क्षेत्रात ११,५१४, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ३८,९०९, तर महापालिकेच्या यादीत सुमारे १८,००० मतदार आहेत.
 
पहिल्या टप्प्यात राज्यातील २७९ नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका होत असून, एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ४ लाख ४३ हजार ६०५ मतदारांपैकी मोठा हिस्सा दुबार नोंदीचा आहे.
 
प्रशासनाकडून या मतदारांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून बोगस मतदान होऊ नये. तरीही, जर एखाद्या मतदाराने नगरपालिकेत मतदान केले आणि त्याचे नाव जिल्हा परिषदेच्या यादीतही असेल, तर तो तिथेही मतदान करू शकतो. अगदी त्याचप्रमाणे, महापालिकेच्या यादीतही नाव असल्यास तो मतदानाचा हक्क बजावू शकतो.
 
दुबार मतदारांची ओळख आणि संमती घेणार प्रशासन
नगरविकास विभागाने दुबार आणि तिबार मतदारांची यादी तयार केली असून, अधिकारी आता त्यांच्या घरी भेट देऊन ते कोणत्या क्षेत्रात मतदान करणार हे विचारणार आहेत. मतदाराने ज्या वॉर्डात मतदान करायचे ठरवले असेल, त्याची लेखी नोंद घेतली जाणार आहे.
 
योगेश डोके, प्रशासन अधिकारी (नगरविकास विभाग, सोलापूर) यांनी सांगितले की,प्रत्येक दुबार मतदाराकडून लेखी निवेदन घेतले जाईल. त्यामुळे मतदानाच्या दिवशी गोंधळ होणार नाही.”
 
निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण-
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एकच मतदार यादी असल्याने तेथे दुबार मतदान शक्य नसते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या टप्प्यांत होत असल्यामुळे ज्या व्यक्तीचे नाव त्या त्या यादीत आहे, त्याला प्रत्येक ठिकाणी मतदान करता येईल, असा स्पष्ट नियम आहे.
Powered By Sangraha 9.0