Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूरच्या गंगाबाई घाट परिसरात भिक मागून जगणाऱ्या तरुणाचा त्याच्याच मद्यपी मित्राने (Drunk friend) निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमार्टम अहवालातून या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला असून, कोतवाली पोलिसांनी देवराव भजनलाल यादव (वय २८, रा. छिंदवाडा, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव सूरज शंकर मेश्राम (वय ३५, रा. कॉर्पोरेशन कॉलनी, गंगाबाई घाट) असे आहे.
दोघेही गंगाबाई घाट परिसरात सफाईचे काम करून तसेच भिक मागून उपजीविका करत होते. २५ ऑक्टोबरच्या रात्री त्यांनी घाटाजवळ बसून दारू पिण्याचा कार्यक्रम केला. नशा चढल्यावर किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद चिघळत गेल्यावर देवरावने झाडूच्या लोखंडी पाईपने सूरजच्या डोक्यावर प्रहार केला. गंभीर जखमी झालेला सूरज काही वेळ तडफडत राहिला आणि नंतर बेशुद्ध झाला. स्थानिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सूरज पाहून पोलिसांना माहिती दिली.
जखमी अवस्थेत सूरजला तातडीने मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ३० ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी हा अपघाती प्रकार समजून नोंद केला होता, पण पोस्टमार्टम अहवालात डोक्यावर खोल जखम झाल्याचे स्पष्ट होताच प्रकरणाचा रंग बदलला. पोलिसांनी तपासाची गती वाढवत देवरावला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सुरुवातीला अनभिज्ञ असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षदर्शींच्या साक्षींमुळे आणि पुराव्यांमुळे अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गेल्या काही दिवसांत नागपूर शहरात हत्यांची मालिका वाढत असून गंगाबाई घाटातील ही हत्या पाचवी ठरली आहे. पारडी, कपिल नगर आणि एमआयडीसी भागातही यापूर्वी हत्या झाल्या आहेत. वाढत्या हिंसक घटनांमुळे पोलिस प्रशासन सावध झाले असून वरिष्ठ अधिकारी गुन्हे रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत.