बिहार विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत ४२.३० टक्के मतदान; बनावट मतदानाच्या आरोपांवरून दोन जणांना अटक

06 Nov 2025 15:09:10
 
Bihar Assembly Elections
 Image Source:(Internet)
पटना :
बिहार विधानसभेच्या (Bihar Assembly) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ४२.३० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या टप्प्यात राज्यातील १८ जिल्यांतील १२१ जागांसाठी मतदान पार पडत आहे.
 
सूर्यगढा विधानसभा क्षेत्रासह पाच मतदारसंघांतील ५६ मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायं. ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, उर्वरित भागांत सायं. ६ वाजेपर्यंत मतदानाची मुदत ठेवण्यात आली आहे. यासाठी राज्यभरात ४५,३४१ केंद्रे उभारण्यात आली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
 
दरम्यान, बनावट मतदानाच्या तक्रारींवरून दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिस दलाने परिस्थिती नियंत्रणात ठेवत शांततेत मतदान सुरू राहावे यासाठी काटेकोर उपाययोजना केल्या आहेत.
 
या टप्प्यात एकूण ३ कोटी ७५ लाख १३ हजार ३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावून १,३१४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबरला पार पडेल, तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत.
 
मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत असून, ग्रामीण भागात महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी गर्दी केली आहे. बिहारच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाने राज्यातील लोकशाहीचा उत्सव नव्या उत्साहाने रंगला आहे.
Powered By Sangraha 9.0