
Image Source:(Internet)
तुमसर:
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार तुमसर नगरपरिषद (Tumsar Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन लोंढे (उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, भंडारा) यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण उपस्थित होते.
नामनिर्देशन प्रक्रिया १० ते १७ नोव्हेंबर दरम्यान पार पडणार असून रविवारी नामनिर्देशन स्वीकारले जाणार नाहीत. १८ नोव्हेंबर रोजी छाननी होईल, तर १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेता येईल. अपील दाखल करण्यासाठी तीन दिवसांची मुदत ठेवण्यात आली असून, २६ नोव्हेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करून चिन्हांचे वाटप केले जाईल.
मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात पार पडेल. निकाल १० डिसेंबरपूर्वी राजपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.
या निवडणुकीत नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असून १२ प्रभागांमधून एकूण २५ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. प्रभाग क्र. १० मधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. शहरात ५० मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. पोलिस आणि प्रशासनाकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून मतपेट्यांसाठी स्ट्रॉग रूम तहसील कार्यालयात असेल.
तुमसर नगरपरिषद क्षेत्रातील मतदारसंख्या ३९,७५६ असून त्यात १९,२०८ पुरुष आणि २०,५४८ महिला मतदारांचा समावेश आहे. दिव्यांग, अंथरुणास खिळलेले आणि अशक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची सुविधा यंदा उपलब्ध नसल्याचे जनार्धन लोंढे यांनी स्पष्ट केले.
शांत, पारदर्शक आणि प्रामाणिक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे सांगत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाही अधिक सक्षम करावी, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.