Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर (Nagpur) शहरातील सार्वजनिक वाहतूक अधिक हरित आणि शाश्वत करण्यासाठी महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोराडी येथील ‘आपली बस’ ई-बस डेपोमध्ये 33 केव्ही/0.433 केव्ही क्षमतेचे अत्याधुनिक वीज सबस्टेशन उभारण्यात आले असून, त्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वाखाली आणि परिवहन व्यवस्थापक राजेश भगत यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. नागपूर मनपाच्या वीज विभागाने स्वबळावर उभारलेले हे पहिले उच्चदाब सबस्टेशन ठरत आहे. यामुळे ई-बस वाहतूक अधिक सुरळीत आणि विश्वासार्ह होणार आहे.
‘पंतप्रधान ई-बस सेवा योजने’तर्गत नागपूरला एकूण १५० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्यापैकी ७५ बस कोराडी येथून तर उर्वरित ७५ बस खापरी डेपोमधून शहराच्या विविध मार्गांवर धावतील. कोराडी येथील या नव्या सबस्टेशनमुळे बस चार्जिंगसाठी अखंड, स्थिर आणि कार्यक्षम वीजपुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे.
या उपक्रमामुळे नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीला नवसंजीवनी मिळणार असून, प्रदूषणमुक्त आणि ऊर्जा कार्यक्षम शहर या दिशेने एक मोठे पाऊल टाकले गेले आहे.