उत्तर नागपुरात ‘डुप्लिकेट मुस्लिम मतदारां’चा मुद्दा तापला; नितीन राऊत यांनी शेलारांविरोधात निवडणूक आयोगात धाव!

05 Nov 2025 14:33:48
 
Nitin Raut runs against Shelar
 Image Source:(Internet)
नागपूर :
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात तब्बल ८ हजारांहून अधिक मुस्लिम मतदारांची (Muslim voters) नावे मतदारयादीत एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवली गेल्याचा दावा राज्याचे मंत्री आशीष शेलार यांनी केल्यानंतर शहरातील राजकारणात चांगलाच खळबळ माजली आहे.
 
या दाव्याचा काँग्रेसचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र निषेध नोंदवत शेलारांवर धर्माच्या आधारावर मतदारांना विभागण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करून शेलार यांच्या वक्तव्याची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
 
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मतदारयादीतील फेरफार आणि मतदार पुनरावृत्तीच्या तक्रारींना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपच्या विजय झालेल्या काही मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या यादीत असल्याचे उदाहरण देत आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना आशीष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारांची पुनरावृत्ती झाल्याचा दावा केला.
 
शेलार म्हणाले की, “मतदारयादीत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठीच हा मुद्दा उपस्थित केला आहे. निष्पक्ष निवडणुका हेच आमचे ध्येय आहे.”
 
तर राऊत यांनी म्हटले की, “भाजप समाजात फूट पाडण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरण घडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोकशाहीला घातक आहे.”
 
या वादामुळे उत्तर नागपूरसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
Powered By Sangraha 9.0