Image Source:(Internet)
नाशिक :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar temple) वैकुंठ चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. हरि-हर भेटीचा शुभयोग साधण्यासाठी हजारो भक्तांनी रात्रीपासूनच रांगा लावून दर्शन घेतले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात दिव्य आरास, विद्युत रोषणाई आणि विशेष पूजाविधी यांचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत झालेल्या या धार्मिक सोहळ्यात वातावरण मंत्रोच्चारांनी दुमदुमले होते. पहाटेच्या सुमारास विश्वस्त मनोज थेट आणि कैलास घुले यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
या निमित्ताने पेशवे सरदार विंचूरकर यांच्या परंपरेप्रमाणे रथ व ब्रह्ममूर्तीची पूजा करण्यात आली. बुधवारचा दिवस हा रथोत्सवाचा प्रमुख दिवस असल्याने मंदिर परिसरात रथ सजवण्याचे, धुण्याचे व विद्युत रोषणाईचे काम जोमात सुरू आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज सायंकाळी चारच्या सुमारास रथ कुशावर्त तीर्थावर नेण्यात येणार आहे. तेथे श्रींच्या अभिषेकानंतर दीपमाळ प्रज्वलित केली जाईल. त्यानंतर रथ पुन्हा मंदिराकडे परत येईल आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी रंगणार आहे. महिलांसाठी परंपरेनुसार ‘त्रिपूर दहन’ सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे.
मध्यरात्रीचा पूजाविधी दिव्य वातावरणात
वैकुंठ चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पहाटे दोन ते चार या वेळेत विशेष पूजा पार पडली. तिथीक्षयामुळे यंदा पहाटेच अभिषेक व सप्तधान्य आरास करण्यात आली. हरि-हर भेटीचा शुभमुहूर्त साधत सुवर्ण आणि रौप्य मुखवटे अलंकृत करून शिवपिंडीवर प्रतिष्ठित करण्यात आले. त्यानंतर मंदिरातच पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मंदिरातील दीपमाळेच्या प्रकाशात आणि भक्तांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिभावाने उजळून निघाला होता. सकाळी ट्रस्ट कार्यालयात भाविकांसाठी पानसुपारीची सोयही करण्यात आली आहे.