पारडी परिसरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार, चालकावर गुन्हा दाखल

05 Nov 2025 16:05:08

accident in Pardi nagpurImage Source:(Internet) 
पारडी (नागपूर) :
पारडी (Pardi) परिसरात सोमवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आर्या यार्डजवळ ही दुर्घटना घडली असून, ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची नावे हरषवर्धन गोपाल बोहरा (४५) आणि दीपेन ओमप्रकाश सोनोने (२४, दोघे रा. साईनगर, पारडी) अशी आहेत. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हे दोघे बजाज प्लेटिना (क्र. MH-49-BF-3211) या दुचाकीवरून बारदवारीकडे जात असताना, वेगात व निष्काळजीपणे येणाऱ्या ट्रकने (क्र. RJ-11-GB-1752) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
 
अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी हरषवर्धन यांना मृत घोषित केले. तर गंभीर अवस्थेत असलेला दीपेन सोनोने याचा उपचारादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी पहाटे सेवन स्टार हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
 
या प्रकरणी दीपेनचा भाऊ कोमल ओमप्रकाश सोनोने (२८) यांनी तक्रार दिली असून, पीएसआय चालुर्कर यांनी ट्रकचालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ व १८४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पारडी पोलिस करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0