
तुळस (Tulsi) म्हणजे घरातील देवत्व, पवित्रता आणि लक्ष्मीचं स्वरूप. जिथं तुळस असते, तिथं घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी नांदते, असं मानलं जातं. पण अनेकदा आपण अज्ञानात काही अशा झाडांच्या सोबतीत तुळस लावतो, ज्यामुळे तिच्या शुभतेवर परिणाम होतो आणि घरात नकारात्मकता येते.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या आसपास काटेरी, दुधाळ किंवा वाळलेली झाडं लावणं घातक ठरू शकतं. या झाडांमुळे घरात वाद, तणाव, आरोग्याचे त्रास आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते. काट्यांनी नकारात्मकता वाढते, दुधाळ झाडांचा विषारी रस पवित्रतेला बाधा पोहोचवतो, तर वाळलेल्या झाडांमुळे घरात अपूर्णता आणि दारिद्र्याचं वातावरण तयार होतं.
तुळस नेहमी कुंडीत लावावी आणि ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी, असं शास्त्र सांगतं. तिला रोज पाणी घालावं, दिवा लावावा आणि विशेषतः गुरुवार व शुक्रवार तुळशीची पूजा करावी. तिच्या आसपास स्वच्छता राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे. चप्पल, झाडू, कचरा किंवा शिवलिंग तुळशीच्या जवळ ठेवणं टाळावं.
तुळशीचं पूजन करताना स्वच्छता आणि मन:शुद्धी आवश्यक आहे. सकाळी हात-पाय धुऊन, स्वच्छ वस्त्रं परिधान करून तुळशीला पाणी शिंपडावं, फुलं अर्पण करावीत आणि दिवा लावून प्रदक्षिणा घालावी. खडीसाखर किंवा फळं अर्पण करून प्रार्थना केल्यास घरात सुख-शांती नांदते, असं मानलं जातं.
संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी देऊ नये, रविवारी फुलं तोडू नयेत आणि अपवित्र अवस्थेत तुळशीला स्पर्श करू नये. या नियमांचं पालन केल्यास तुळस देवीचा आशीर्वाद सदैव घरावर राहतो, असं शास्त्र सांगतं.
ही सर्व माहिती पारंपरिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रावर आधारित आहे. याची वैज्ञानिक शहानिशा आवश्यक असून, अचूक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.