विषारी कफ सिरप घोटाळ्यात नवा ट्विस्ट; सह-आरोपी ज्योती सोनी अखेर अटक!

04 Nov 2025 19:39:51
 
cough syrup scam Jyoti Soni
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
२२ निरपराध नागरिकांचा जीव घेणाऱ्या विषारी कफ सिरप (Poisonous cough syrup) घोटाळ्याचा तपास अधिक गतीमान झाला आहे. या प्रकरणातील सह-आरोपी आणि मुख्य आरोपी डॉ. प्रवीण सोनी यांची पत्नी ज्योती सोनी हिला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ती परसियामध्ये स्वतःचं मेडिकल स्टोअर चालवत होती आणि गुन्ह्यानंतर बराच काळ फरार होती.
 
फरारी अवस्थेत ज्योती बंगळुरू आणि वाराणसीसारख्या ठिकाणी लपून राहिली होती. दरम्यान, तिने जबलपूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र एसआयटीला मिळालेल्या माहितीनंतर सोमवारी परसियावर छापा टाकून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.
 
तपास अहवालात उघड झालं आहे की ज्योतीने फार्मासिस्ट सौरभ जैन आणि न्यू अपना फार्मा ऑपरेटर राजेश सोनी यांच्यासोबत मिळून ‘कोल्ड्रिफ’ या विषारी कफ सिरपच्या साठ्यात छेडछाड केली आणि पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमागे मुख्य आरोपी डॉ. प्रवीण सोनी यांना वाचवण्याचा उद्देश होता.
 
सौरभ जैन आणि राजेश सोनी या दोघांना यापूर्वीच अटक झाली आहे, तर ज्योती आता पोलिसांच्या ताब्यात आली आहे. तिच्या अटकेबद्दल मात्र परसियामध्ये चर्चेचा विषय रंगला आहे. काहीजणांचा दावा आहे की तिने स्वेच्छेने आत्मसमर्पण केलं, तर पोलिसांच्या मते ती थेट अटक करण्यात आली.
 
एसआयटी आता ज्योतीने फरारी काळात कोणाशी संपर्क साधला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी कोणाची मदत घेतली, याचा तपास करत आहे. या अटकेनंतर विषारी कफ सिरप घोटाळ्याचं रहस्य आणखी गडद झालं आहे.
Powered By Sangraha 9.0