नागपुरात ‘मिशन २०२७’ अंतर्गत विदर्भ आंदोलन; १६ डिसेंबरला भव्य ‘लाँग मार्च’सह ‘जनसंकल्प मेळावा’

03 Nov 2025 19:41:01
 
Vidarbha movement under Mission
 Image Source:(Internet)
नागपूर :
विदर्भ राज्य आंदोलन समितीने (वि.रा.आ.स.) ‘मिशन २०२७’ (Mission 2027) ची घोषणा करत, “२०२७ पूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य मिळवणारच” असा ठाम निर्धार जाहीर केला आहे. ग्रामीण भागातून सुरू झालेलं हे आंदोलन आता शहरी पातळीवर वेग घेत असून, १६ डिसेंबर २०२५ रोजी नागपुरात भव्य ‘लाँग मार्च’ आणि ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे.
 
हा लाँग मार्च इतवारी येथील विदर्भ चंडीका मंदिर शहीद चौकातून सकाळी १२ वाजता सुरू होऊन चिटणीस पार्कवर दुपारी १ वाजता संपणार आहे. चिटणीस पार्कवरील मेळाव्यात विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनतेचा पुन्हा एकदा निर्धार व्यक्त केला जाणार आहे.
 
वि.रा.आ.स.च्या राज्यस्तरीय कोअर कमिटीची बैठक आज (३ नोव्हेंबर) अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खदिवाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, महिला अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, तसेच विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
 
बैठकीत तात्यासाहेब मत्ते यांची विदर्भ प्रचार प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करत समितीने म्हटले की, राज्याचे महसुली उत्पन्न ५.६० लाख कोटी असून कर्ज व व्याजाचा बोजा तब्बल ९.८३ लाख कोटी आहे. याशिवाय ९५ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांची जबाबदारी सरकारवर आहे.
 
“महाराष्ट्र आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि या सर्व समस्यांचे खरे उत्तर म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच आहे,” असा ठाम संदेश समितीकडून देण्यात आला.
 
आंदोलन समितीने सर्व विदर्भवासीयांना १६ डिसेंबरच्या नागपूर लाँग मार्च आणि जनसंकल्प मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0