डोक्यावरचे केस गेले म्हणून म्हातारे समजू नका;मंत्री गुलाबराव पाटील यांची भाजपला थेट तंबी!

03 Nov 2025 15:05:50
 
Gulabrao Patil
 Image Source:(Internet)
जळगाव :
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना महायुतीतील अंतर्गत मतभेद अधिकच तीव्र होताना दिसत आहेत. युतीच्या माध्यमातून लढायचे की स्वबळावर, या प्रश्नावर अजूनही भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात एकमत झालेलं नाही.
 
दरम्यान, शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला इशारा देत म्हटलं, “डोक्यावरचे केस गेले म्हणून म्हातारे समजू नका. मागच्या वेळी झालेली बंडखोरी या वेळी सहन केली जाणार नाही!”
 
पाचोरा येथे आयोजित शिंदे गटाच्या निर्धार सभेत बोलताना पाटील यांनी भाजपवर थेट टीका केली. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदारांनी मनापासून मदत केल्याने जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही महिला खासदारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने गद्दारी केली आणि शिंदे गटाच्या आमदारांविरोधात बंडखोर उभे केले.
 
याच मुद्द्यावरून शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही भूमिका घेत सांगितले की, पाचोरा-भडगाव मतदारसंघात यावेळी शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
 
भाजप आणि शिंदे गट यांच्यातील वाद उफाळून आल्याने महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उमेदवारी वाटपासह स्थानिक पातळीवरील वर्चस्व आणि संघटनात्मक हितसंबंधांवरून तणाव वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
 
राज्यभरात महायुती टिकवण्यासाठी समन्वय राखण्याचे प्रयत्न सुरू असले, तरी जळगाव जिल्ह्यातील या घडामोडीमुळे आगामी निवडणुकांमध्ये समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0