तेलंगणात भीषण अपघात; डंपर-बस धडकेत २० ठार, अनेक विद्यार्थी जखमी

03 Nov 2025 16:37:08
 
accident in Telangana 20 killed
 Image Source:(Internet)
रंगारेड्डी (तेलंगणा) :
रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात खडीने भरलेल्या डंपरने राज्य परिवहन महामंडळाच्या बसला दिलेल्या धडकेत झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बस तंदूरहून हैदराबादकडे जात असताना खानपूर गेटजवळ चुकीच्या दिशेने येणाऱ्या डंपरने बसला जबर धडक दिली. धडकेनंतर बसचा अक्षरशः चुराडा झाला, तर डंपरमधील खडी बसमधील प्रवाशांवर कोसळली. त्यामुळे अनेक प्रवासी ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
 
अपघातावेळी बसमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवासी होते, त्यापैकी बहुतांश विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येतं. बसच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत सुमारे १५ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जेसीबीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
अपघातानंतर हैदराबाद–विजापूर नॅशनल हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. चेवेल्ला-विकाराबाद मार्गावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
या अपघातात बस चालक आणि ट्रक चालक दोघांचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महिलांचाही समावेश असून, एका महिला आणि तिच्या अवघ्या १५ महिन्यांच्या चिमुकल्याचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
 
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल गंभीर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन बचाव आणि मदत कार्याला गती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, जखमींवर उत्तम उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.या अपघातानं संपूर्ण तेलंगणा हादरलं असून, घटनास्थळी अद्याप बचावकार्य सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0