कामठीत प्रचारसभेत अनोखा प्रकार; राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तरुणाकडून नोटांची उधळण

29 Nov 2025 23:37:33
 
NCP
 Image Source:(Internet)
नागपूर :
कामठीतील (Kamptee) निवडणूक प्रचाराचा जोर वाढत असताना एका विचित्र घटनेने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहजहाँ शफावत अन्सारी यांच्या सभेत एका तरुणाने अचानक मंचावर धाव घेत त्यांच्या अंगावर पैसे फेकण्याची धक्कादायक कृती केली. हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
 
प्रचारसभेत अन्सारी आपले भाषण सुरू ठेवत असतानाच हा युवक पुढे आला आणि हातभर नोटा काढून थेट उमेदवारांवर फेकू लागला. अन्सारी यांनीही त्याला थांबवण्याचा कोणताही प्रयत्न न करता त्या तरुणाला जवळ घेतल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सभेला काही क्षण वेगळाच रंग चढला.
 
स्टेजवर त्या तरुणाने अन्सारींबद्दल आपला आदर व्यक्त करत, “ते नेहमी लोकांच्या मदतीसाठी पुढे असतात, त्यांना कोणत्याही चिन्हाची गरज नाही,” असे म्हणत पुन्हा एकदा नोटांचा वर्षाव केला. सभेत उपस्थित काही लोकांनी या कृतीचे स्वागत केल्याने वातावरण अधिकच गोंधळाचे बनले.
 
या प्रकरणानंतर निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रचाराच्या निर्णायक टप्प्यात घडलेल्या या घटनेमुळे कामठीतील राजकीय चर्चांना नव्या वळण मिळाले असून परिस्थिती अधिक ताणलेली दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0