मी खूप आळशी आहे, पण...;नागपूर बुक फेस्टिव्हलमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य

29 Nov 2025 20:49:22
 
Mohan Bhagwat
Image Source:(Internet) 
नागपूर :
नागपूर बुक फेस्टिव्हलच्या (Nagpur Book Festival) उद्घाटन सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित तरुण आणि साहित्यप्रेमींशी मुक्त संवाद साधत वाचन, भाषा आणि ‘राष्ट्र’ या संकल्पनांवर आपले विचार मांडले.
 
आपल्या संबोधनाची सुरुवात करताना ते म्हणाले, “मी अगदी आळशी माणूस आहे, पण वाचायला खूप आवडतं. त्यामुळे जे लिहितात त्यांच्याबद्दल माझ्या मनात आपोआपच मोठा सन्मान निर्माण होतो.”
 
भागवत यांनी पुढे ज्ञानाच्या दोन पैलूंवर प्रकाश टाकला.त्यांच्या मते,ज्ञान म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर त्यामागील अर्थ समजून घेणेही तेवढंच महत्त्वाचं आहे. माहिती मिळवणं हेही ज्ञान आहे आणि समज प्राप्त करणं हेदेखील ज्ञान आहे.”
 
भारतीय भाषांची समृद्धी आणि अनुवादातील अडथळे-
भाषाविषयक विचार मांडताना त्यांनी सांगितले की, काही भारतीय संकल्पना इंग्रजीमध्ये अचूक व्यक्तच होत नाहीत.
 
“इंग्लिशमध्ये काही भारतीय संकल्पनांसाठी योग्य शब्दच नाहीत. भारतीय भाषांमध्ये त्या अर्थाची खोली आहे. अनुवादाच्या प्रक्रियेत अनेकदा मूळ अर्थ बदलतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
‘राष्ट्र’ आणि ‘नेशन’ संकल्पनेतील फरकाबाबत भाष्य-
स्वतःला काहीजण ‘राष्ट्रवादी’ म्हणतात, याबाबत बोलताना भागवत म्हणाले,मी कोणत्याही ‘वाद’मध्ये (वादविवादात) पडत नाही. परंतु पाश्चिमात्य जगात ‘नेशन’ आणि आमच्या ‘राष्ट्र’ संकल्पनेत मूलभूत फरक आहे. आपण नेशन म्हणतो म्हणून त्यातून ‘नेशनलिझम’ शब्द येतो. पण आपण जे ‘राष्ट्रत्व’ किंवा ‘राष्ट्रीयता’ म्हणतो त्याचा अर्थ वेगळा आहे.
 
पाश्चात्त्य देशांमध्ये नेशनलिझमला अनेकदा नकारात्मक अर्थाने पाहिले जाते, कारण त्यांच्या इतिहासात दोन मोठ्या युद्धांचे अनुभव आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
 
नागपूर बुक फेस्टिव्हलमध्ये भागवत यांच्या या विचारांनी उपस्थितांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले असून, साहित्य-वाचन संस्कृतीबद्दलचे त्यांचे चिंतन विशेषत्वाने चर्चेत आहे.
Powered By Sangraha 9.0