Image Source:(Internet)
कल्याण डोंबिवली :
राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीत भाजपच्या माजी नगरसेवक श्रीकर चौधरी व त्यांची पत्नी, माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी अचानक पक्षाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय भाजपसाठी धक्कादायक असून, राजीनाम्याच्या मागील कारणांनी पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.
श्रीकर चौधरी यांनी भाजपला दिलेल्या राजीनाम्यामुळे ही निवडणूक आधीच रंगलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या रणनीतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यात पक्षाच्या तिकीट वाटपातील अस्पष्टता आणि कार्यकर्त्यांच्या अनदेखीवर नाराजी व्यक्त केली आहे.
श्रीकर चौधरी म्हणाले, "भाजपमध्ये नवीन पक्षप्रवेश करणाऱ्यांना तिकीट मिळेल असा आश्वासने देण्यात आली, पण कार्यकर्त्यांचा विचार न करता निर्णय घेतल्यामुळे आम्हाला दु:ख झाले. आम्हाला आता पक्षाला गरज नसेल तर आम्हालाही राजकारणाची गरज नाही."
संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यावरही दोघांनीही पक्षाशी संपर्क न ठेवता राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
श्रीकर चौधरी पुढे म्हणाले, "1995 पासून पक्षासाठी काम करत आहोत. 2000 पासून मी दोनदा आणि माझी पत्नी दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलो. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत कटिबद्ध राहिलो. आता तिकीटवाटपातील अस्पष्टता आणि दुर्लक्ष यामुळे आम्ही नाराज आहोत. त्यामुळे राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे."
कल्याण डोंबिवलीत भाजपच्या या महत्त्वाच्या नेत्यांच्या राजीनाम्यानंतर पक्षाच्या पुढील रणनीतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुढील महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला या धक्क्याचा कसा सामना करावा लागेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.