मेयो रुग्णालयात धक्कादायक प्रकार; महिला रेसिडेंट डॉक्टरची विभागप्रमुखाविरोधात छेडछाडसह धमक्यांची तक्रार

    28-Nov-2025
Total Views |
 
Mayo Hospital
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) घडलेल्या एका गंभीर प्रकरणाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. फॉरेन्सिक विभागात पीजी करणाऱ्या एका महिला रेसिडेंट डॉक्टरने विभागप्रमुखावर छेडछाड, अश्लील वर्तन आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
 
तक्रारीनुसार, २७ वर्षीय डॉक्टर फेब्रुवारी २०२५ पासून मेयो रुग्णालयात कार्यरत आहे. तीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की विभागप्रमुख डॉ. मकरंद सूर्यकांत व्यवहारे गेल्या काही महिन्यांपासून अयोग्य टिप्पण्या करत असल्याचे आणि संशयास्पद वर्तनामुळे ती मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे नमूद केले आहे.
 
पीडित डॉक्टरच्या मते, आरोपी डॉक्टर वारंवार तिला केबिनमध्ये एकटीला बोलवत होते आणि विरोध केला तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून गंभीर परिणामांची धमकी देत होते. अखेर त्रास असह्य झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली.
 
तक्रार नोंदविल्यानंतर तहसील पोलिसांनी छेडछाड आणि धमकी यांसंदर्भातील कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे मेयो रुग्णालयातील वातावरणात तणाव निर्माण झाला असून वैद्यकीय वर्तुळातही या घटनेची मोठी चर्चा आहे. पोलिसांच्या तपासानंतरच संपूर्ण प्रकरणाचे पुढील स्वरूप स्पष्ट होणार आहे.