कियारा–सिद्धार्थच्या कन्येचं नाव जाहीर; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

28 Nov 2025 15:13:44
 
Kiara Siddharth daughter
 Image Source:(Internet)
मुंबई :
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ (Siddharth) मल्होत्रा यांच्या घरी जुलै महिन्यात कन्यारत्नाचं आगमन झालं होतं. मुलीचं नाव काय असेल, याबाबत चाहत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठी उत्सुकता होती. अखेर कियाराने शुक्रवारी इंस्टाग्रामवरील एका भावनिक पोस्टमधून कन्येचं नाव अधिकृतपणे जाहीर करत चाहत्यांची प्रतीक्षा संपवली.
 
कियाराने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये चिमुकलीच्या लहानशा पायांचा गोंडस क्षण कैद केला असून, त्याचसोबत जोडप्याने आपल्या मुलीचं नाव ‘सरायाह मल्होत्रा’ असल्याचं सांगितलं. पोस्ट शेअर होताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. चाहत्यांपासून ते अनेक नामांकित सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या खास क्षणी कियारा–सिद्धार्थ दाम्पत्यावर शुभेच्छा पाठवल्या.
 
कियाराने लिहिलेलं कॅप्शनही तितकंच हृदयस्पर्शी होतं. “आमच्या प्रार्थनांपासून आमच्या बाहुपर्यंत… दैवी आशीर्वादापासून आमच्या राजकुमारीपर्यंत,” अशा भावनिक शब्दांत तिने मुलीचं नाव सार्वजनिक केलं. ‘सरायाह’ हे नाव हिब्रू शब्द सारा पासून प्रेरित असल्याची चर्चा आहे, ज्याचा अर्थ ‘राजकुमारी’ असा होतो.
 
काही चाहत्यांनी ‘कियारा’ आणि ‘सिद्धार्थ’ या नावांतील अक्षरांवरून ‘सरायाह’ तयार केल्याचंही सुचवलं, मात्र कोणताही उगम असला तरी या नावातली गोडी आणि त्यामागची भावना अत्यंत सुंदर असल्याचं नेटकरी सांगत आहेत.
 
जुलैमध्ये मुलीच्या जन्मानंतर कियारा आणि सिद्धार्थने एक भावनिक संदेश शेअर करत म्हटलं होतं, “आमचं हृदय प्रेमाने भरून आलं आहे आणि आमचं जग कायमचं बदललं आहे. आमच्या आयुष्यात एका लेकीचं आगमन झालं आहे.” त्या पोस्टनंतरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला होता.
Powered By Sangraha 9.0