SC विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; ‘सर्वोच्च दर्जाची शिष्यवृत्ती’ योजनेचे सुधारित नियम जाहीर

27 Nov 2025 17:25:53
 
Scholarship scheme
 Image Source:(Internet)
नागपूर :
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने “सर्वोच्च दर्जाची शिष्यवृत्ती” योजनेचे (Scholarship scheme) नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले आहेत. या सुधारित नियमांमुळे देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या SC विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण शुल्कासह विविध शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळणार आहे.
 
सरकारने सांगितले आहे की पात्र विद्यार्थ्यांचे ट्यूशन फी आणि नॉन-रिकर्निंग शुल्क थेट डीबीटीमार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी २ लाख रुपयांपर्यंतच्या शुल्काला कव्हरेज देण्यात येणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये –
पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना ८६,००० रुपयांचा शैक्षणिक भत्ता दिला जाणार असून पुढील प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी ४१,००० रुपयांची रक्कम उपलब्ध होईल. ही मदत प्रवास खर्च, पुस्तके, लॅपटॉप तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साधनांसाठी उपयुक्त ठरेल.
 
अर्ज करण्यासाठी पात्र कोण?
नवीन नियमांनुसार वार्षिक कुटुंब उत्पन्न ८ लाखांपर्यंत असलेल्या SC विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आयआयटी, आयआयएम, एम्स, एनआयटी, एनआयएफटी, एनआयडी, एनएलयू, आयएचएम यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये नुकतेच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू राहील. विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असल्यास शिष्यवृत्ती प्रत्येक वर्षी नूतनीकरण केली जाईल.
महत्त्वाच्या अटी –
एका कुटुंबातील फक्त दोन मुलांनाच योजनेचा लाभ घेता येईल.
केंद्र किंवा राज्य सरकारव्यतिरिक्त इतर कोणतीही शिष्यवृत्ती घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
प्रवेशानंतर विद्यार्थी संस्थेत बदल करत असल्यास पात्रतेची पुनर्तपासणी केली जाईल.
 
आरक्षण आणि जागांची माहिती –
२०२४–२५ या शैक्षणिक वर्षासाठी ४,४०० नवीन जागांची तरतूद करण्यात आलेली आहे. २०२१–२२ ते २०२५–२६ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २१,५०० शिष्यवृत्ती जागा उपलब्ध राहतील. यापैकी ३० टक्के जागा SC महिला विद्यार्थिनींसाठी राखीव असून, या जागा भरल्या नाहीत तरी पुरुष विद्यार्थ्यांना त्या दिल्या जाणार नाहीत.
 
केंद्राच्या या निर्णयामुळे आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून दूर राहणाऱ्या अनेक SC विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण झाली आहे. प्रतिष्ठित संस्थांत शिकण्याचा मार्ग आता त्यांच्या दृष्टीने अधिक सहज आणि खुला होणार आहे.
Powered By Sangraha 9.0