Image Source:(Internet)
नागपूर:
भारतीय राज्यघटनेने (Indian Constitution) दिलेली विधीमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय पालिका ही शक्तीस्थळे आपल्या देशाच्या विविधतेत एकता राखण्यास मोलाची भूमिका बजावतात, असे प्रतिपादन राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी संविधान दिनानिमित्त आयोजित भव्य रॅलीच्या शुभारंभप्रसंगी केले.
डॉ. कांबळे म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा पाया आपल्याला गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतून मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भारतीय राज्यघटनेतील या मूल्यांचा आधार घेत त्यांना एकसंध भारतासाठी मार्गदर्शक म्हणून सादर केले आहे. विविध भाषा, जात, धर्म आणि पंथांनी नटलेल्या भारताला एका सूत्रात बांधण्याचे काम संविधानाने केले आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, मागास व बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त मंगेश वानखेडे आणि सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, संविधानात दिलेली प्रत्येक मूल्य आपण नागरिक म्हणून आपल्या वर्तनातून जपणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाच्या उद्देशिकेमध्ये दिलेल्या तत्त्वांना आत्मसात करून समाजात न्याय, समानता आणि एकात्मतेचा संदेश द्यावा.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनीही संविधानातून मिळालेली अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही अमूल्य देणगी असून, त्याचे संरक्षण व इतरांच्या अधिकारांचा सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. घर घर संविधान कार्यक्रमांतर्गत २० हजार नागरिकांपर्यंत संविधान उद्देशिका पोहोचविण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या वेळी ज्येष्ठ नागरिकांना संविधान उद्देशिकेचे प्रतिनिधीत्वात्मक भेटवस्तू दिल्या गेल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अवनी वेखंडे-सूतवणे यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयापासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप संविधान चौक येथे करण्यात आला.