भाजपला पैशाच्या बळाची गरज नाही;निलेश राणेंच्या आरोपांवर नितेश राणेंचे प्रत्युत्तर

27 Nov 2025 23:36:06
 
Nitesh Rane response to Nilesh Rane
 Image Source:(Internet)
मुंबई :
मालवणमध्ये भाजप कार्यकर्ता विजय केनवडकर यांच्या निवासस्थानी झालेल्या तपासाबाबत निलेश राणे (Nilesh Rane) करत असलेल्या टीकेवर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. “हा विषय चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,” असे ते म्हणाले.
 
नितेश राणे म्हणाले की राजकारणात असणाऱ्या लोकांची स्वतःची रोजगार-उद्योगाची साधने असतात.“कोणी हॉटेल व्यवसाय चालवतो, कोणी पर्यटनात आहे, काहीजण दुकानं चालवतात. त्यातून येणारा पैसा येणं-जाणं स्वाभाविक आहे. यात काहीही गैर नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
त्यांनी सांगितले की वाद, आरोप-प्रत्यारोपात पडण्याची त्यांची इच्छा नाही. तपासाची जबाबदारी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे आहे.“आपण मधे का पडायचं? चौकशी होऊ द्या, सत्य बाहेर यायलाच पाहिजे,” असे ते म्हणाले.
 
विजय केनवडकर हे अनेक वर्षे व्यवसायात आहेत आणि त्यांच्याकडून कोणतेही गैरप्रकार झाल्याचा विश्वास वाटत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
 
नितेश राणे पुढे म्हणाले, “आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांसारखे नेतृत्व आहे. पैशाच्या जोरावर निवडणूक लढवण्याची गरज भाजपला नाही. आम्ही विकासकामे आणि सरकारी योजनांच्या आधारे जनतेपुढे जात आहोत.”
 
ते म्हणाले की कितीही आरोप झाले तरी भाजपची मोहीम विकासावरच केंद्रीत राहणार आहे.“पैसे वाटण्याची गरज नाही. मोदींच्या योजनांचा लाभ लोकांना आधीच मिळालाय. शेवटच्या दिवशीपर्यंत आम्ही फक्त विकासाचंच बोलणार,” असे राणे यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0