Image Source:(Internet)
अयोध्या :
शतकानुशतके प्रतीक्षेत राहिलेल्या राम भक्तांसाठी आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा ठरला. अयोध्येतील (Ayodhya) श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि RSS प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते भगवा धर्मध्वजाचे विधिवत आरोहण करण्यात आले. या क्षणी हजारो भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
धर्मध्वज फडकावल्यावर पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित करत भावपूर्ण भाषण केले. त्यांनी सांगितले की, हा फक्त एक ध्वज नाही, तर भारतीय संस्कृतीचे सार आणि रामराज्याच्या मूल्यांचे जिवंत प्रतीक आहे.
मोदी पुढे म्हणाले, भगवा रंग, सूर्यवंशाचे चिन्ह, पवित्र ‘ओम’, आणि कोविदार वृक्ष—ही सर्व चिन्हे रामराज्याच्या तेजस्वी परंपरेची साक्ष आहेत. हा धर्मध्वज एक संकल्प आहे, एक संघर्षाची कहाणी आहे. पुढील हजारो वर्षांपर्यंत भगवान रामाच्या आदर्शांचे हे प्रतीक जगाला मार्गदर्शन करत राहील.
पंतप्रधानांनी ध्वजामागील संदेश अधोरेखित करत सांगितले. “हा ध्वज सांगतो की वचनाला प्राणांपेक्षा महत्त्व द्यावे. कर्म, कर्तव्य आणि प्रामाणिकता हेच जीवनाचे मूलमंत्र आहेत. समाजातील वैर, भेदभाव आणि दुःख दूर करण्याचा संदेश हा धर्मध्वज देतो. असा समाज घडवूया जिथे कोणीही उपाशी किंवा वंचित राहणार नाही.
अयोध्येतील या सोहळ्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण असून अनेकांनी हा क्षण ‘रामराज्याच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल’ म्हणून गौरवले आहे.