खापरखेडा परिसरात पिकनिकसाठी गेलेल्या दोन मित्रांवर अनोळखी तरुणांचा हल्ला; एक ठार, एक गंभीर जखमी

24 Nov 2025 23:25:03
 
friends attacked
 Image Source:(Internet)
नागपूर :
खापरखेडा (Khaparkheda) परिसरातील बिना संगम येथे रविवारी सायंकाळी पिकनिकसाठी गेलेल्या तीन मित्रांवर अनोळखी तरुणांच्या टोळक्याने धक्कादायक हल्ला केला. या हल्ल्यात आशिष रोशन गोंडाणे यांचा मृत्यू झाला असून सुशिलकुमार मोतीराम गेडाम गंभीर जखमी आहेत.
 
फिर्यादी सुशिलकुमार गेडाम (वय ३३, रा. पाहुणे ले-आऊट, पिवळी नदी, नागपूर), त्यांचे मित्र आशिष गोंडाणे (वय ३३) आणि सचिन मुनिमहेश मिश्रा (वय ३१) हे तिघे पिकनिकसाठी गेले होते. दुपारी सचिन मिश्रा काही कामानिमित्ताने ठिकाण सोडून गेला. सायंकाळी सुमारे ५:३० वाजता ४ ते ५ अनोळखी तरुणांनी त्यांच्याजवळ येऊन लायटर मागितला. लायटर दिल्यानंतर आरोपींनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी आणि आशिष यांनी त्यांना मज्जाव केला असता, आरोपींनी दोघांवर दगडांनी हल्ला केला.
 
या हल्ल्यात सुशिल गेडाम बेशुद्ध झाला, तर आशिष गोंडाणे यांना छातीत चाकूने वार करून गंभीर जखमी करण्यात आले. दोघांनाही तातडीने कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी आशिष यांना मृत घोषित केले. सुशिल गेडाम यांच्यावर सध्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
 
या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात सुशिल गेडाम यांच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1), 109, 352 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून तपास सुरू आहे.
 
या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0