Image Source:(Internet)
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या विवाहसोहळ्यापूर्वी अचानक आरोग्यसंकट निर्माण झाल्याने दोन्ही कुटुंबांवर चिंतेचे सावट पसरले आहे. रविवारी सांगलीत दोघांचा विवाह होणार होता. मात्र स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही तासांतच पलाश मुच्छलचीही प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप स्थिर स्थिती नसल्याने कुटुंबीयांनी लग्न काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान पलाश मुच्छललाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताच्या त्रासाने त्रस्त झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या ते हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहेत. डॉक्टरांनी काही दिवस पूर्ण काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
दोन्ही कुटुंबांतर्फे परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन लग्नसोहळा थांबवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. मानधना कुटुंबातील नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी सांगितले की, “स्मृतीचे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत कोणताही विवाहसोहळा पार पडणार नाही.”
अचानक उद्भवलेल्या या घटनांमुळे सांगलीत आधीच पोहोचलेल्या पाहुण्यांना परतावं लागलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूही मागील दोन दिवसांपासून सांगलीत उपस्थित होते.
या संपूर्ण घडामोडींमुळे चाहत्यांमध्येही मोठी चिंता निर्माण झाली असून दोघेही पूर्णपणे बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.