मनसे–उद्धवसेना युतीत उमेदवारीवरून खदखद;जागावाटपात ‘धुसफूस’ उफाळली!

22 Nov 2025 16:43:46
 
MNS-Uddhav Sena alliance
 Image Source:(Internet)
अंबरनाथ :
आगामी पालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना युतीला रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) हातमिळवणी केली असली, तरी उमेदवारी जाहीर करताच या नव्या युतीत अंतर्गत नाराजी उसळल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः मनसेच्या ११ उमेदवारांना प्राधान्य दिल्याने उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
 
युती झाली, पण आतील तणाव वाढला?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना (उबाठा) विरोधात मैदानात उतरणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांनीच आता पालिका निवडणुकीत प्रवेशाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र जागावाटप जाहीर करताना अनेक ठिकाणी उबाठाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वगळून मनसेकडील कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आल्याची चर्चा जोरात आहे.
 
या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) व मनसेने अधिकृत आघाडी केली असून उबाठाकडून ३५ तर मनसेकडून ११ उमेदवार उतरणार आहेत. विशेष म्हणजे मनसेचे उमेदवारदेखील उबाठाच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे उबाठा गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये “आपल्याच घरात मागे ढकलले” अशी भावना निर्माण झाल्याचे सांगितले जाते.
 
स्थानिक पातळीवरील नाराजी मान्य-
या स्थितीबाबत विचारले असता मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी, “युतीतील स्थानिक प्रमुखांनी चर्चेनंतर जागावाटप केले आहे. मनसेनेदेखील १७ आणि २४ क्रमांकाच्या प्रभागांमधील दोन जागा उबाठाला दिल्या आहेत. त्यामुळे कोणताही गंभीर वाद नाही,” असे स्पष्टीकरण दिले.
 
मात्र शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख अजित काळे यांनी काही प्रभागांत नाराजी असल्याचे मान्य केले. त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी उबाठाकडून अंजली राऊत यांची निवड झाल्याने या पदाची इच्छा असणाऱ्या काही नेत्यांमध्येही असंतोष निर्माण झाल्याचे समोर येत आहे. काही जणांनी तर “आम्ही नगराध्यक्षपदासाठी काम करणार नाही” अशी भूमिका घेतल्याची माहिती मिळते.
 
युतीचे नाट्य पुढे आणखी रंगणार?
अंबरनाथमध्ये शिवसेना–भाजपची परंपरागत लढत कायम असली तरी या वेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांसारखे मविआतील पक्षही नगराध्यक्षपदासाठी थेट रिंगणात उतरले आहेत. त्यातच उबाठा–मनसे युतीतील असंतोष वाढत असल्याने निवडणूक समीकरणे अजून गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे.
 
येत्या काही दिवसांत वरिष्ठ नेतृत्वाने नाराज गटाला समजावून युती एकसंध ठेवण्यात कितपत यश मिळते, यावर पुढील राजकीय घटनाक्रम ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0