Image Source:(Internet)
मुंबई :
महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून थंडीने अक्षरशः कडाका वाढवला आहे. पुणे, नाशिक, नागपूर, यवतमाळ, अकोला यांसह अनेक शहरांत सकाळ-संध्याकाळ काटा सरळ जाणवेल इतका गारठा असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, गुरुवारी काही भागांत थंडीत किंचित शिथिलता जाणवली असली तरी वातावरण ढगाळ राहिल्यामुळे हवामानात बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. याच पाश्र्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी पावसाचा इशारा देत तीन जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गमध्ये हलक्या पावसाची शक्यता-
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात हवामान चक्रात अचानक बदल होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग येथे रिमझिम ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.
धुळ्यात पारा घसरून 7.5 अंशांवर-
राज्यातील तापमानात अचानक मोठी घट दिसून येत आहे. धुळे जिल्ह्यात राज्यातील सर्वात कमी म्हणजे 7.5 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. परभणीचा पारा 8.9 अंशांपर्यंत घसरला, तर निफाडमध्ये तापमान 8 अंशांपर्यंत खाली आले. पुणे, आहिल्यानगर, महाबळेश्वरातही तापमान 11 अंशांच्या खाली नोंदले गेले.
पुण्यातील थंडीची धूम – बाप्पालाही उबदार स्वेटर-
पुण्यात पहाटेची थंडी नेहमीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे. नागरिक अक्षरशः थरथरत बाहेर पडत आहेत. सारसबाग गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पांना लोकरचा स्वेटर आणि कानटोपी परिधान करून थंडीपासून संरक्षण देण्यात आले आहे. पुणेकरांमध्ये या अनोख्या परंपरेची जोरदार चर्चा रंगत आहे.
नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन-
हवामान विभागाने शेतकरी, प्रवासी आणि सामान्य नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. डोंगराळ भागांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून सकाळ-संध्याकाळ धुक्याची दाट शक्यता कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यात तापमान घसरत असताना ढगाळ वातावरणामुळे हवामानात अचानक उलथापालथ होण्याची शक्यता असून पुढील 24 तास हवामानदृष्ट्या निर्णायक ठरणार असल्याचे विभागाने सांगितले आहे.