लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेत बदल; लाभार्थ्यांना मोठा दिलासा, अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली

22 Nov 2025 18:05:48
 
Ladki Bhaeen Yojana
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bhaeen Yojana) लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत KYC प्रक्रियेत मोठे बदल जाहीर केले आहेत. विशेषतः पती आणि वडील दोघेही हयात नसलेल्या महिलांना होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने पर्यायी KYC मार्ग उपलब्ध करून दिला आहे. तसेच KYC पूर्ण करण्याची अंतिम मुदतही ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
 
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पती किंवा वडिलांची KYC अनिवार्य होती. मात्र, दोघेही निधन पावलेल्या महिलांना केवायसी करताना तांत्रिक तसेच कागदपत्रांच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नवीन प्रक्रिया लागू केली असून, पात्र महिलांना आता ऑनलाईन व ऑफलाइन अशा दोन टप्प्यांत KYC पूर्ण करता येणार आहे.
 
नवीन KYC प्रक्रिया : लाभार्थ्यांसाठी मार्ग सुकर-
१) ऑनलाईन KYC
महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करावे.
KYC विभागात जाऊन आधार क्रमांक टाकावा.
नोंदणी केलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाकून प्राथमिक KYC पूर्ण होते.
२) ऑफलाइन कागदपत्र पडताळणी
ऑनलाईन KYC केल्यानंतर खालील कागदपत्रे प्रत्यक्ष सादर करावी लागणार आहेत 
 
पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र
घटस्फोटित महिलांसाठी न्यायालयीन घटस्फोट आदेश
 
ही कागदपत्रे महिला व बालविकास विभागाकडे जमा केल्यानंतर शासन स्तरावर त्यांची शहानिशा केली जाईल. तपास पूर्ण झाल्यावर पात्र महिलांना योजनेचा लाभ मंजूर केला जाणार आहे.
 
लाभार्थ्यांना दिलासा-
सुधारित प्रक्रियेमुळे पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांच्या अर्जातील अडथळे दूर झाले आहेत. यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थींना दिलासा मिळणार असून, प्रशासनानेही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
Powered By Sangraha 9.0