महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय वाढणार का? राज्यभरात उत्सुकता, निर्णयाची प्रतिक्षा

21 Nov 2025 15:18:18
 
Government employees
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरू शकणारा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. महाराष्ट्रात सेवानिवृत्तीचे (Retirement) वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत वाढवले जाणार का? या प्रश्नावर कर्मचारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात सकारात्मक संकेत दिसत असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा अधिक बळावल्या आहेत.
 
देशातील बहुतांश राज्यांमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये ६० वर्षे निवृत्ती वय लागू आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही ५८ वर्षे नियम लागू असल्याने कर्मचारी असंतोष व्यक्त करत आहेत. या निर्णयात बदल करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे.
 
कर्मचारी संघटनांनी शासनाकडे वेळोवेळी प्रस्तावही मांडले आहेत. निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळू शकतो असे संकेत दिले होते आणि अभ्यास समिती स्थापन केली होती. परंतु नंतरच्या राजकीय बदलांमुळे हा विषय मागे पडल्याचा आरोप संघटनांकडून होत आहे.
 
कर्मचाऱ्यांची मांडणी-
अनेकांना उशिरा सरकारी नोकरी मिळत असल्याने त्यांचा सेवाकाल आपोआप कमी होतो.
NPS व्यवस्थेअंतर्गत कमी सेवाकालामुळे मिळणारी पेन्शनही मर्यादित राहते.
सेवेत फक्त १–२ वर्षांची तूट राहिल्याने अनेकांची पदोन्नती हुकते.
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याची नाराजी वाढत आहे.
कर्मचारी संघटनांचे मत स्पष्ट आहे —
“सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे अत्यावश्यक बनले आहे.”
 
सरकारची भूमिका काय?
कर्मचारी वर्गाच्या नाराजीचा विचार करता, शासन लवकर निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही.
राज्यातील लाखो कर्मचारी शासनाच्या पुढील पावलाकडे नजर लावून आहेत. निर्णय सकारात्मक असल्यास मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0