पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नारा येथे होणाऱ्या हिंद-की-चादर कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन

21 Nov 2025 20:46:39
- येत्या 7 डिसेंबरला नारा मैदानावर होणार कार्यक्रम

Hind ki ChadarImage Source:(Internet) 
नागपूर :
शिख धर्माचे नववे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त येत्या 7 डिसेंबरला नारा येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद दी चादर (Hind ki Chadar) या कार्यक्रमासाठी सुमारे 5 लाख भाविक अपेक्षित असून त्यांच्यासाठी विविध सेवाने परिपूर्ण असलेल्या भव्य मंडप व कार्यक्रम स्थळाचे भूमिपूजन राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर, कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक, माजी नगरसेवक विक्की कुकरेजा, मनपाचे उपायुक्त राजेश भगत, अशोक गराटे, हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीचे विदर्भ अध्यक्ष सरदार गुरुमितसिंग खोक्कर, महेंद्र राजपूरा, प्रीतपाल सिंग भाटीया, सुनील मुलगावकर, सुखविंदर सिंघ डिल्लोन (सोनू महाराज), जसपाल सिंग सिंधू, परमजित सिंग भट्टी, गजेंद्र सिंग लोहिया, गुरदयाल सिंग पड्डा, मलकित सिंह बल, टिटू ढिल्लो, प्रितपाल सिंग भाटीया, समस्त शिख, सिकलगार, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांनी सत्य, संयम, मानवता, करूणा आणि धैर्य या मूल्यांचा अमूल्य संदेश दिला. त्यांच्या 350 व्या बलिदान वर्षा निमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादूर 350 व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने 7 डिसेंबर रोजी नारा येथील सुरेश चंद्र सुरी मैदानात येथे भव्य समारोह आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समवेत अनेक मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
 
भूमीपूजन समारंभानंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आरोग्य, सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, परिवहन याबाबत चर्चा करण्यात आली. 7 डिसेंबर रोजी होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात कथा, कीर्तन आणि प्रवचनाचा लाभ भाविकांना होणार आहे. भाई मनप्रीत सिंह, भाई अमरजीत सिंह, भाई चमनजीत सिंह, भाई जगतार सिंह, बीबी दलेर कौर, तरनजीत सिंह, संत ज्ञानी हरनाम सिंह, बाबा संत सिंह आदी मान्यवर प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत.
Powered By Sangraha 9.0