मालेगावात तीन वर्षांच्या चिमुरडीवर क्रूर अत्याचारानंतर हत्या; आरोपीला अटक

19 Nov 2025 23:07:38
 
Malegaon Accused arrested
 Image Source:(Internet)
मालेगाव :
मालेगाव (Malegaon) तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष कृत्याने परिसरात मोठा संताप निर्माण झाला आहे.
 
घटनेचा तपशील:
१६ नोव्हेंबर रोजी, गावातील विजय संजय खैरनर (वय २४) या आरोपीने या निरागस चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचे डोके दगडाने ठेचून मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना समजताच मालेगाव पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक केली आहे.
 
चिमुरडीचा मृतदेह घरात आणल्यानंतर संपूर्ण गावात दुःख, राग आणि संतापाची लाट पसरली आहे. कुटुंबीयांसह गावातील लोक हतबल झाले आहेत.
 
प्राथमिक तपासणीत समोर आलेले मुद्दे:
पोलिस तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, आरोपी आणि मुलीच्या वडिलांमध्ये सुमारे एका महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून रागावलेला आरोपी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज्याचे मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या खटल्याचा फास्टट्रॅक कोर्टात वेगाने न्याय होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, सरकारी वकील उज्वल निकम यांना हा खटला सांभाळण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे.
 
लासलगावमध्ये निषेध मोर्चा:
या अमानुष घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथील सुवर्णकार समाजाने शिवाजी चौकातून पोलिस ठाण्यापर्यंत शांततापूर्ण मूक मोर्चा काढला. या मोर्चात महिलांसह अनेक समाजबांधवांनी सहभागी होऊन आरोपीला कडक शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
 
मोर्चादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले गेले. याशिवाय, ऑल इंडिया पँथर सेना यांनीही कठोर कारवाईची मागणी करत स्वतंत्र निवेदन पोलिसांना सादर केले आहे.
 
या घटनेमुळे सामाजिक स्तरावर जबरदस्त खळबळ उडाली असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे.
Powered By Sangraha 9.0